Gold Silver Price Drop : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, पहा नवीन दर
जालना : जालना शहरातील सराफा बाजारात मागील दोन दिवसांत सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या दरात तब्बल 25 ते 30 हजार रुपयांची, तर सोन्याच्या दरात 10 ते 12 हजार रुपयांची घट झाल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
जालना जिल्ह्यात सोने आणि चांदीतील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. त्यामुळे अनेक नागरिक गुंतवणुकीसाठी सोने-चांदीकडे वळले होते. मात्र अलीकडच्या काळात डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होणे, परदेशात ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे मागणी घटणे, तसेच बाजारात पुरवठा जास्त असणे या कारणांमुळे सोन्या-चांदीच्या किमती झपाट्याने कमी झाल्या आहेत. परिणामी सलग दोन दिवस दर घसरल्याचे चित्र दिसून येत आहे.
गुरुवारी जालना सराफा बाजारात चांदीचा दर 2 लाख 35 हजार रुपये प्रति किलो, तर सोन्याचा दर 1 लाख 32 हजार रुपये प्रति तोळा इतका नोंदवला गेला. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार 30 डिसेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 23 हजार 293 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. हा दर 31 डिसेंबर रोजी घसरून 1 लाख 21 हजार 919 रुपये झाला.
त्याचप्रमाणे 24 कॅरेट सोन्याचा दर 31 डिसेंबर रोजी 1 लाख 33 हजार 099 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला. मंगळवारी हा दर 1 लाख 34 हजार 599 रुपये होता. म्हणजेच एका दिवसात सोन्याच्या दरात सुमारे 1500 रुपयांची घट झाली.
चांदीच्या दराबाबत सांगायचे झाल्यास, मंगळवारी चांदीचा दर 2 लाख 32 हजार 329 रुपये प्रति किलो होता. तो 31 डिसेंबर रोजी कमी होऊन 2 लाख 29 हजार 433 रुपये प्रति किलो झाला. म्हणजेच चांदीच्या दरात सुमारे 2900 रुपयांची घसरण झाली.
खरेदी कमी, गुंतवणूकदार सावध
सोन्या-चांदीचे दर कमी झाल्यामुळे बाजारात गर्दी वाढेल अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात उलट चित्र दिसत आहे. दर घसरूनही सराफा दुकानांमध्ये ग्राहकांची संख्या कमी आहे. अनेक गुंतवणूकदारांनी सध्या सोने-चांदी खरेदी टाळण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.