उद्या पावसाचा इशारा, या राज्यांत अलर्ट जारी
डिसेंबर महिना संपत आला असला तरी देशातील काही भागांमध्ये अजूनही पावसाचे वातावरण कायम आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने 31 डिसेंबर रोजी पावसाचा मोठा इशारा दिला आहे. हवामानात सतत बदल होत असल्याने लोकांना थंडी, ऊन आणि पावसाचा एकाच दिवसात अनुभव येत आहे.
सकाळी कडाक्याची थंडी जाणवते, तर दुपारी उन्हाचा चटका बसतो. काही ठिकाणी अचानक ढगाळ वातावरण होऊन पाऊस पडतोय. उत्तर भारतात थंडी वाढल्यामुळे महाराष्ट्रातही थंड वाऱ्यांचा परिणाम जाणवत आहे. त्यामुळे राज्यात तापमान झपाट्याने कमी होत आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात गुलाबी थंडी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
यावर्षी नोव्हेंबर आणि दिवाळीतही राज्यात पावसाने हजेरी लावली होती. संपूर्ण डिसेंबर महिन्यात थंडी कायम होती. आता पुन्हा एकदा थंडी वाढण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
महाराष्ट्रातील किमान तापमान
राज्यात अनेक ठिकाणी तापमान 10 अंशांच्या खाली गेले आहे.
परभणी येथे 6.3 अंश सेल्सिअस,
निफाड आणि धुळे येथे 7.3 अंश,
अहिल्यानगर 7.7 अंश,
तर भंडारा, नाशिक, नागपूर, जेऊर आणि यवतमाळ येथे सुमारे 10 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे.
उत्तर भारतात पंजाबमधील हिस्सार येथे देशातील सर्वात कमी तापमान 2.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.
31 डिसेंबरला पावसाचा अलर्ट कुठे?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 31 डिसेंबरच्या संध्याकाळपासून उत्तर भारतातील पाच राज्यांमध्ये हवामान बिघडण्याची शक्यता आहे.
यामध्ये:
- हिमाचल प्रदेश
- उत्तराखंड
- दिल्ली
- हरियाणा
- जम्मू-काश्मीर
या राज्यांमध्ये पावसासोबत थंड वारे वाहण्याची शक्यता आहे.
दक्षिण भारतातही पावसाची शक्यता
पुढील काही दिवसांत तामिळनाडूच्या अनेक भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. नागपट्टणम, तंजावर, मायिलादुथुराई आणि पुदुकोट्टई जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे. केरळच्या काही भागांमध्येही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
थंडी आणखी वाढणार
उत्तर भारतात गारठा वाढल्यास त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होतो. शीत लहरी वाढल्यामुळे राज्यात कडाक्याची थंडी पडते. त्यामुळे नागरिकांनी थंडीपासून काळजी घेण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.